Saturday, January 30, 2021

राजर्षी शाहू महाराज

            समाज विभागाच्या महाराष्ट्रातले विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले गेलेले कोल्हापूर. या कोल्हापूर शहरामध्ये माहेरघराचा पाया घालणारा महापुरुष म्हणजे शाहू महाराज. महाराजांनी १९१७ साली त्यांच्या राज्यात मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. १९०२ साली राखीव जागांसाठी केलेला कायदा. हे दोन्ही कायदे त्या काळात अतिशय दुर्मिळ होते.

          शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणावर जोर दिला. प्राथमिक शिक्षणाविषयी एका भाषणात ते म्हणतात, "शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे. इतिहास असे सांगतो की, कोणत्याही देशाची उन्नती शिक्षणामुळेच होते. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये कधीही निपजणार नाही. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदूस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. या बाबतीत आमचा गतकाळ म्हणजे इतिहासातील एक अंधारी रात्र आहे. फक्त एका जातीने विद्येचा मक्ता घेतला होता. खालच्या कमी जातींच्या लोकांना विद्यामंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले."


            शिक्षणातील अडचणींचे पेशवाईतील उदाहरण देतांना शाहू महाराज सांगतात, "श्री प्रतापसिंह महाराज छत्रपती हे पेशव्यांच्या ताब्यात असतांना लहानपणी लिहणे वाचणे शिकण्याचीही त्यांना बंदी होती. तेव्हा त्यांच्या आईने रात्री बारा वाजता उठवून ब्राम्हणेत्तर पंतोजीकडून लिहणे-वाचणे शिकविण्याचे काम केले. छत्रपतींची अशी स्थिती, तर मग इतरांची काय कथा." एका ठिकाणी महाराज म्हणतात, "प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याअगोदर सध्या उपयोग असलेली शाळागृहे विस्तृत व हवेशीर केली पाहिजेत व तिकडे खु्ई करण्याची जास्त जरुरी आहे. No Cake to a few untill all are served with bread हे इंग्लंडमधील मजूर पक्षाचे धोरण होते. पण येथे शेकडा नव्वद लोक उपाशी आहेत व दहा लोक पोळी खात आहेत.

           सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करतांना महाराजांनी पालकांना दंड ठेवला. मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा एक रुपया दंड घेतला जाई. आय. सी. एस. च्या परिक्षा संदर्भात महाराज म्हणतात, "आय. सी. एस. च्या खटपटीला आणि कॉलेज स्थापन करायला पैसा भरपूर मिळतो पण प्राथमिक शिक्षणास मात्र या लोकांजवळ पैसा नाही का?" कोल्हापूरात महाराजांनी उच्च शिक्षणासाठी सुद्धा प्रयत्न केले. हायस्कूल व कॉलेज काढले.

            दलित वर्गाच्या शिक्षणाविषयी महाराजांनी खास काळजी घेतली. परंपरेचे गुलाम बनलेले संस्थानातील काही शिक्षक मागासलेल्या जातीच्या मुलांना शाळेच्या व्हरांड्यात बसवत. मग शिक्षण देत. महाराजांच्या हे लक्षात आल्यानंतर महाराजांनी ८ ऑक्टोबर १९१९ रोजी खास हुकुम काढला. त्या हकुमात म्हटले होते, "करवीर इलाख्यात अस्पृश्य लोकांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा आहेत. त्या येत्या दसऱ्यापासून बंद कराव्यात व अस्पृश्यांच्या मुलांस सरकारी शाळांत इतर मुलाप्रमाणेच दाखल करुन घेत जावे. सरकारी शाळांतून शिवाशीव पाळण्याची रीत नसल्याने सर्व जातीच्या व धर्माच्या मुलांस एकत्र बसविण्यात यावे."

             दुसऱ्या हुकुमांत ते म्हणतात, "स्पृश्य वर्गापेक्षा अस्पृश्यांना जास्त ममतेने व आदराने वागवावे. कारण स्पृश्य लोक कोणत्याही प्रकारे शिक्षणास आपला मार्ग काढू शकतात. परंतू अस्पृश्यांना ते असाध्य असल्यामुळे कोणताही मार्ग नाही. शाळा खात्यातील कोणालाही इसमाची असे करण्यास हरकत असेल तर त्याने हा हुकूम झाल्यापासून सहा आठवड्यांचे आत आपला राजीनामा पाठवावा व त्याला पेन्शन मिळणार नाही.

              दलित समाजातील मुलांना प्रोत्साहनपर आणि आवश्यक म्हणून स्कॉलरशिप व सवलती मिळत. राजाराम कॉलेजमध्ये मुलींना फी माफ होती. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळांची वेळ त्यांच्या सोयीने असावी. असे आदेश महाराजांचे होते. महाराजांनी कोल्हापूर संस्थानात अनेक वसतिगृहे बांधली. यातील बहुतेक वसतिगृहे महाराजांच्या काळातील आहे. यातील अनेक वसतिगृहे जातवार आहेत. काही सर्व जातीची होती व आहेत. खेड्यातील मुलांना शहरात येऊन चांगले व वरचे शिक्षण घेता यावे म्हणून त्या त्या समाजाला महाराजांनी प्रोत्साहन दिले. बहुतेक वसतिगृहांना कायम उत्पन्न मिळावे म्हणून शेती व इतर सोयी करुन दिल्या. महाराजांनीच एका ठिकाणी 'कोल्हापूरचा उल्लेख' वसतिगृहाची जननी असा केला आहे तो रास्तच आहे. या वसतिगृहाचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी कोल्हापूरात येऊन शिकले. ही वसतिगृहे नसती तर जे शिकू शकले नसते असे सुशिक्षीत महाराष्ट्रात भरपूर आहे.

            आज घडीला शिक्षणास बंदी घालणारी जुनी परंपरा मोडली गेली. परंतू नवी बंदी शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून येत आहे. ज्याला शक्य असेल त्याने, परवडेल त्याने शिकावे, इतरांनी घरी बसावे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment

राजर्षी शाहू महाराज

            समाज विभागाच्या महाराष्ट्रातले विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले गेलेले कोल्हापूर. या कोल्हापूर शहरामध्ये माहेरघराचा पाय...