Saturday, January 30, 2021

आगरकरांच्या राजकीय विचारांची पाश्वभूमी

            गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या ३१ वर्षाच्या अत्यंत खडतर अशा आयुष्यात वाणीने, लेखणीने, कृतीने लोकशिक्षणाचे काम केले. आपल्या बाणेदार व स्वतंत्र वागण्याने समाजापुढे आदर्श निर्माण केला, आगरकरांच्या काळातील वैचारिक पार्श्वभुमी विचार केला तर असे लक्षात येईल की इंग्रजांच्या राज्याचे महाराष्ट्रातील समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले होते, त्यांनी येथे शिक्षण सुरू केले, रयतवारी व्यवस्था लागू केली. मराठी गद्य वाङ्मयाचा उदय झाला.


बाळशास्त्री जामेकर यांनी १८३२ साली 'दर्पण' नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. भारतात लोकसत्ताक राज्य स्थापन व्हावे असे त्यांना वाटत होते. भास्कर तर्खडकरांनी, भारतावरचे इंग्रजांचे राज्य वरदान नसुन शाप आहे असे मत मांडले. लोकहितवादी यांनी प्रभाकर' मधील शतपत्रामधून "५०० वर्षांनी भारतात लोकशाही प्रजासत्ताक स्थापन होईल" असे भाकीत केले होते.


१८५० नंतर हळूहळू वैगवेगळ्या विचारांच्या दिशा स्पष्ट होऊ लागल्या. या काळात परमहंस समेची स्थापना झाली. या समेने महत्वाच्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली, त्या काळात महाराष्ट्रात चार विचारप्रवाह अस्तित्वात होते. पहिला प्रवाह प्रार्थनासमाज, प्रा., भांडारकर, रानडे, चंदावरकर इत्यादी नेते प्रार्थना समाजासाठी काम करत होते,सार्वजनिक सभा व सामाजिक परिषद यांच्याद्वारा आपले काम वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. दुसरा विचारप्रवाह म. जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा होता. म. फुले यांच्या विचाराचे अधिष्ठान मानवी अधिकारांची प्रतिष्ठा हे होते. फुले निर्मिकवादाचे पुरस्कर्ते होते. भारतातील हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व सांगणारा तिसरा प्रवाह निर्माण झाला होता. विष्णुबुवा ब्रम्हचारी त्याचे अध्वर्य होते. प्रा जिन्सीवाले, विश्वनाथ नारायण मंडलिक व महाराष्ट्रातील घिऑसकीचे काही पुरस्कर्ते यांचा यात समावेश होता. या काळात सनातनी ब्राम्हण वर्गाल या लोकांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.


          या विचार संगराच्या काळात चिपळूणकर, टिळक, आगरकर यांच्या नेतृत्वाखाली चौथा विचारप्रवाह महाराष्ट्रात निर्माण झाला. चिपळूणकरांनी नवी शाळा काढली. केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू झाली. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा वयाच्या ३२ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यावेळी आगरकर-टिळक यांचे वय २५-२६ वर्षांचे होते. टिळक-आगरकरयांच्या चौथ्या पक्षाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती. भारतावरील इंग्रजांचे राज्य हे वरदान नसून शाप आहे म्हणून भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.


           तत्वदृष्ट्या प्रगती करायची असेल, तर अज्ञेयवाद आणि विवेकवाद ही तत्वे स्वीकार करणे. त्याग व समर्पणाची भावना ठेवून, गरिबीत राहून तत्वासाठी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवणे. राजकीय व सामाजिक परिवर्तनाचे काम पुढे नेण्यास वर्तमानपत्रे साहाय्यकारक ठरतील पण ती लोकभाषेत असली पाहिजेत... जागृती, संघर्ष, संघटन आणि चळवळ ही चतुःसूत्री महत्वाची आहे.


याच आधारावर टिळकांनी समाजात प्रचंड असा असंतोष निर्माण केला, पण स्वराज्यवादी आगरकर ते पाहण्यासाठी जिवंत नव्हते. टिळक व आगरकर यांच्या नवविचारामुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक व राजकीय चळवळ सुरू झाली. त्यांच्या स्वराज्यवादी स्वातंत्र्य समर्थक व आंदोलनोत्सुक विचारांचा प्रभाव तरुण पिढीवर पडला. टिळकांनी स्वराज्यांची चळवळ तळागाळापर्यंत नेली आणि कर्मयोगी वेदान्ताचा पुरस्कार केला तर आगरकर यांनी सामाजिक परिवर्तनाची दिशा स्पष्ट करुन त्याचा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास केला. आज आगरकरांनी प्रतिपादन केलेल्या मार्गानेच स्थूलमानाने देशाची वाटचाल होतांना दिसते.


            आगरकर यांचा जन्म इ.स. १८५६ साली सातारामधील टेंभू या गावी झाला. शिक्षण घेण्यासाठी रत्नागिरीपर्यंत त्यांना पायपीठ करावी लागली. त्यांनी एम. ए. पर्यंत शिक्षण घेतले. ते बुद्धीमान असल्यामुळे त्यांना शिष्यवृत्या मिळत. पण त्यांनी सरकारी नोकरी केली नाही. ते चिपळूणकरांनी सुरू केलेल्या 'न्यू इंग्लीश स्कूल' मध्ये सामील झाले. ते केशरीचे संपादक होते. हे संपादक पद सात वर्ष सांभाळले. त्यांच्या कार्यकाळात 'केसरी'चा खप जवळपास चार हजार झाला होता.


पुढे टिळक व आगरकर यांच्यात वैचारिक वाद होऊन ते वेगळे झाले. टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूल' आणि फर्ग्युसन कॉलेज यांचा त्याग केला व आगरकरांनी केसरीचे संपादक पद सोडले. आगरकर नंतर फर्ग्युसन महाविद्यालयात प्रोफेसर झाले व नंतर प्राचार्यपद सुद्धा त्यांना मिळाले. आगरकरांना दम्याचा विकार झाला. या काळात त्यांनी विवेकवादाचा व समाजसुधारणांचा सातत्याने पुरस्कार केला. वैचारीक संघर्षात त्यांनी माघार घेतली नाही.


आगरकरांनी केसरीचे संपादक पद सोडल्यानंतर सुधारक नावाचे वर्तमानपत्र काढले. त्यांनी हे वर्तमानपत्र एकहाती चालविले. त्यांचे सर्व लिखाण सुधारकातून प्रकाशित झाले आहे. त्या काळात सुधारकाचा खप चार-साडेचार हजारांच्या जवळपास होता. आगरकरांनी विपुल लेखन केले. त्यांचा स्वभाव पत्रकाराचा व समाज प्रबोधकाचा होता. त्यांच्या साध्या अग्रलेखातही तत्वचिंतनाची व तत्वज्ञानाच्या व्यासंगाची चमक होती.


त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा विचार केला तर त्यांच्या वैचारिक लिखाणास सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाचा खोल असा पाया आहे. हर्बर्ट स्पेन्सरचा विवेकवाद आणि उत्क्रांतीवाद त्यांना भावला व त्यांचे विचारांच्या आधारावर त्यांनी आपले सामाजिक विचार मांडले तसेच वेंचम आणि जे. एस. मिल यांच्या उपयुक्ततावादी तत्वज्ञानाचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव पडला होता. तसेच त्यांनी ऑगस्ट कॉम्टेच्या विज्ञानवाद विचारांचा त्यांनी अभ्यास केला होता. आगरकरांना कॉम्टेचे विचार मान्य होते तसेच प्रा. सेलपी यांच्या विचारांचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता. प्रा सेलपी यांचे मत असे होते की, जसजसा आधुनिक विज्ञानाचा व तत्वज्ञानाचा प्रभाव वाढत जातो तसतशी लोकांच्या मनातील धर्मश्रद्धा कमी होईल. यामुळे आगरकर हे विज्ञानवादाचे व इहवादाचे पुरस्कर्ते बनले.


आगरकरांना भारतीय परंपरेतील मागासलेले सामाजिक व राजकीय विचार मान्य नव्हते. वेदप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्याचा त्यांना तिटकारा होता. त्यामुळे त्यांचे विचार वेगळे व उठून दिसतात. आगरकरांचे असे मत होते की, भारतातील सामाजिक गुलामगिरी, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा आणि धर्माच्या नावाने सुरू असलेला अनैतिक व्यवहार थांबवायचा असेल तर आपल्याला आधुनिक विचारांचा स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही.

No comments:

Post a Comment

राजर्षी शाहू महाराज

            समाज विभागाच्या महाराष्ट्रातले विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले गेलेले कोल्हापूर. या कोल्हापूर शहरामध्ये माहेरघराचा पाय...